पन्हाळा (प्रतिनिधी) : सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संलग्न सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या कोल्हापूर विभागीय पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा आणि बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा उत्साहात झाल्या.

या स्पर्धेमध्ये संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक, तर मुलींच्या संघाने व्दितीय क्रमांक मिळवला. कोल्हापूर विभागीय स्पर्धेचे आयोजन संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले होते. येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुलांच्या २० संघांनी, तर मुलींच्या ४ संघांनी सहभाग घेतला होता.

बास्केटबॉल निवड चाचणीमध्ये २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व्हॉलीबॉल स्पर्धेतील मुलांचा अंतिम सामना संजीवन कॉलेज, पन्हाळा विरुद्ध अशोकराव माने कॉलेज, वाठार यांच्यात झाला. यामध्ये संजीवनने विजेतेपद पटकावले. मुलींचा अंतिम सामना एएसपीएम कॉलेज, सांगलीवाडी विरुद्ध संजीवन कॉलेज, पन्हाळा यांच्यामध्ये झाला. यामध्ये ‘संजीवन’ला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पंच म्हणून अबिद मोकाशी, नूरमहंमद नागरजी, कपिल खोत, अक्षय पोवार यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौरभ भोसले, जयंत कुलकर्णी, भास्कर कांबळे, सागर पाटील, आप्पासो पल्लखे व नितीन बहादुरे यांनी सहकार्य केले. विजयी संघास क्रीडाशिक्षक डॉ. रणजित इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव जैन, उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे सहकार्य लाभले.