सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज सांगलीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नाराज कॉंग्रेस नेत्यांची भेट घेतली. तर या भेटीनंतर संजय राऊत यांनी विशाल पाटील हे आमच्याच कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते माघार घेतील, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने खासदार संजय राऊत हे सांगलीमध्ये दाखल झालेत. तर संजय राऊत यांची नाराज काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर राऊतांनी विशाल पाटील माघार घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. संजय राऊत यांची काँग्रेस आमदार जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी भेट घेऊन त्यांचं स्वागतही केलं. तसेच यानंतर बंद दाराआड संजय राऊत, जयंत पाटील, नाराज काँग्रेस नेते आणि चंद्रहार पाटील यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती मिळालीये.

दरम्यान, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनी म्हटलं की, मुंबईत आघाडी एकत्र झाली आहे. सांगलीत देखील आता पहिल्यांदा आघाडी एकत्र आली आहे. जे जे आघाडीचे नेते आहेत ते सगळे सोबत आहेत, असं राऊत म्हणाले.
सांगली अत्यंत मजबुतीने पुढे जात आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडी 100 टक्के जिंकणार. विशाल पाटील आमच्या कुटुंबातील आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, असे अनेक ठिकाणी झाले पण ते माघार घेतील, असा दावा देखील संजय राऊतांनी यावेळी केला आहे.

विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस आग्रही होती. यातून शिवसेना ठाकरे गटावर काँग्रेसकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या मागील दौऱ्यावेळी आणि महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार देखील घातला होता. मात्र आता काँग्रेसने नरमाईयची भूमिका घेत,आघाडी धर्म पाळण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसत आहे.