कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

घाटगे यांनी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महाराष्ट्रभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा जवळपास तिप्पट गतीने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामानाने कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. पुढील दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी. शाहू साखर कारखान्यामार्फत चालवण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवू, असे सांगत त्यांनी सर्व पद्धतीचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अ. धोंं. माळी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चितच मदत होते. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये पाचव्या क्रमांकावर असून शेहेचाळीस टक्के पर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, बंटी सावंत आदी उपस्थित होते.