मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? अशा शब्दांत टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. स्वप्नातले सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानेच उतरवले आहे. तसे नसते तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावे लागले नसते, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हाणला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होता. तोच धागा पकडून पंतप्रधान हे राज्य सरकारचे कौतुक करण्यासाठी पुण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का ? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

त्याला चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे की, सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांतदादांनी म्हटले आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की स्वप्नातले सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाहीतर १०५ आमदार घेऊन त्यांना घरी का बसावे लागले असते ? अशक्य ते शक्य करून दाखवले त्याला एक वर्ष झाले. अजूनही काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना चंद्रकांतदादांना पाहावी लागणार आहेत. चंद्रकांतदादांची वैफल्यग्रस्त, निराशाजनक मानसिकता आम्ही समजू शकतो. पण सत्तेत येण्याची दिवास्वप्ने सोडून विरोधात आहोत हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असंही त्या म्हणाल्या.