कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक उपाययोजना राबवूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हेबएक्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचा आढावा घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समन्वय अधिकारी आणि प्रभाग समिती सचिव यांना अधिक गतीशीलतेने अहोरात्र काम करण्याची सूचना आयुक्त कलशेट्टी यांनी केली. ‘संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. शिवाय प्रभाग समिती सचिवांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावे, यामध्ये हायगय करु नका. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे तंतोतंत पालन करा, तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गतीमान करा, नागरिकांना कोणतेही लक्षण दिसून आल्यास त्यांची तपासणी करा’, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.