कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर मंडप, स्टेज, स्वागत कमानीसाठी खुदाई करण्यावर महानगरपालिका प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खुदाई करता येणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे मंडप उभारणार की नाही, याकडे लक्ष लागून राहिले आहे.  

प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण यंदा कोरोनामुळे उत्साहावर पाणी फिरले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक मंडळांना उत्सव साजरा करण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पूजन करण्यात येणाऱ्या देवीची मूर्ती चार तर घरात पूजनासाठी वापरण्यात येणाऱ्या मूर्तीची उंची २ फुट असावी असे बंधन आहे.

गरबा, दांडिया असे सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी कोरोना प्रतिबंध, साथीचे आजार, स्वच्छतेसंबंधी जनजागृती करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. धार्मिक विधी करताना सामाजिक सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. असे कोरोना टाळण्यासाठीच्या नियमांचे पालन करत रस्ते खुदाईवरही बंदी घालण्यात आली आहे.