मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भीषण दहशतवादी हल्ल्यात कसाब याला जिवंत पकडताना हुतात्मा झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा अशोक चक्र पदकाने सन्मान करण्यात आला होता. आता त्यांना आणखी नव्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात संशोधकांना सापडलेल्या नव्या कोळी प्रजातीला ‘आयसीयस तुकारामी’ असे नाव दिले गेले आहे.

संशोधक ध्रुव प्रजापती यांच्या टीमने या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. संशोधकांच्या एका टीमने प्रसिद्ध केलेल्या एका प्रबंधामध्ये याचा पहिला उल्लेख केला आहे. प्रजापती यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात ‘कोळी’ किटकाच्या दोन नव्या प्रजाती मिळाल्या आहेत. त्यातील एका प्रजातीला माझा मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ Phintella cholkei (फिन्टेला चोळकी) असं नाव दिले आहे. तर देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या तुकाराम ओंबळे यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या प्रजातीला ‘आयसीयस तुकारामी’ असे नाव देण्यात आले आहे.