कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये दिल्ली, गुजरात, हैदराबाद, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. शिवाजी विद्यापीठमध्ये सैफ सेंटरने सहावा स्तुती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या सात दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सर्व संशोधक विद्यार्थी तसेच व्याख्यात्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे व प्रशासकीय कौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे.

सैफ सेंटर हे विद्यार्थ्यांसाठी औधोगिक क्षेत्रासाठी आम्ही समर्पित केलेले आहे. अशा प्रकारच्या संशोधक विद्यार्थी व औद्योगिक क्षेत्रातील संशोधक व्यक्तीकडून प्रशंसा होणे म्हणजेच माझ्या कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली. त्याचा मला आनंद आहे. याच्यापुढेही सैफ सेंटर, शिवाजी विद्यापीठच्या सहकार्याने अशाप्रकारे कार्यशाळा व विविध अद्ययावत वैज्ञानिक महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सैफ.डी. एस. टी. सेंटरचे प्रा.आर. जी. सोनकवडे यांनी म्हटले आहे.

स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध व्याख्यात्यांनी वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान दिले. स्तुतीच्या सर्व कर्मचारी तसेच विद्यापीठातील भौतिकशास्रच्या संशोधक विद्यार्थ्यानी अहोरात्र मेहनत करून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वीरीत्या पार पाडला. प्रत्येक विद्यार्थ्यानी अशा प्रकारची अद्वितीय व्यवस्था व असे प्रशिक्षण आजपर्यंत विद्यार्थ्यांना कुठेही मिळालेले नाही, असे सांगितले.

सहभागी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सुविधा पुरविल्याबद्दल, तसेच काही जुन्या संकल्पनाना उजळणी दिल्याबद्दल मनोगत व्यक्त करून डॉ. सोनकवडे यांचे आभार मानले. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील शास्त्रज्ञांनी या कार्यक्रमाच्या कुशल आयोजनाचे तसेच विद्यापीठातील सैफ सेंटरची उपकरणे अगदी अचूक प्रकारे कार्यरत असल्यामुळे डॉ. सोनकवडे यांचे भरभरून कौतुक केले. विशेष बाब म्हणजे हा स्तुती कार्यक्रम डॉ. सोनकवडे यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेला आहे.

डॉ. प्रतिष्ठा पांडे अध्यक्ष, रिसर्च अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट डिव्हिजन, डी. एस. टी. नवी दिल्ली यांनी या उत्तम प्रकारे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची  छयाचित्रे देखील मागवून घेतली आहेत. डॉ. सोनकवडे यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे यामध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे निरोप दिला. जेव्हा पन्हाळा येथे शैक्षणिक सहल केली तेव्हा त्यांनी या करवीर नगरीतील इतिहासाचा सुद्धा आवर्जून अभ्यास केला.

पन्हाळा येथील शिवाजी विद्यापीठाच्या स्पेस सायन्स सेंटर येथे जाऊन संपूर्ण वैज्ञानिक माहिती घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. या विद्यार्थ्यांनी मधुर संगीताचा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आपल्या मनावर आलेली मरगळ दूर करून नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. याचे संपूर्ण श्रेय शिवाजी विद्यापीठातील मॅनेजमेंट कौन्सिल व भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.