कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी निवडणूक कार्यालयामध्ये आढावा घेतला. यावेळी गणेशोत्सवच्या अनुषंगाने मिरवणुकीचा मार्ग व मुख्य रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. या बैठकीस शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व सर्व उप-शहर अभियंता उपस्थित होते.

प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी पावसामुळे शहरातील जे रस्ते खराब झाले आहेत, त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसात सुरु करुन एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना सर्व उप-शहर अभियंत्यांना दिल्या. जे रस्ते महापालिकेमार्फत निविदा काढून करण्यात आलेले आहेत, त्या रस्त्यांचा आढावा घेऊन हे रसते का खराब झाले याबाबत उप-शहर अभियंता यांच्याकडून कारणमीमांसा विचारणा केली. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या ३ वर्षात जे रस्ते केले आहे, त्या सर्व रस्त्यांची यादी या विभागाकडून पत्र देऊन मागणी करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आय.आर.बी.ने केलेल्या रस्त्यांची गेली १० वर्षे डागडुजी झालेली नाही. या सर्व रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक आहे. यासाठी ६० कोटींची आवश्यक आहे. जे रस्ते गेले ४ ते ५ वर्षे केलेले नाहीत त्या रस्त्यावर जास्त खड्डे पडलेले आहेत. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्कचे काम गणेश उत्सवापूर्वी प्राधान्याने करण्यात येणार आहे. नगरोत्थान पहिला व दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्‍य रस्ते करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर केला आहे. यास तांत्रिक मान्यता झाली असून, अंतिम मंजुरी येणे बाकी आहे. त्यामुळे या प्रस्तावातील मुख्य रस्ते डागडुजी अथवा नवीन करण्यात आलेले नाहीत.

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले रस्त्यांची यादी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या रस्त्यांची यादी नागरिकांनी पाहून या रस्त्यावर खड्डे अथवा खराब झाले असल्यास नागरिकांनी त्वरित महापालिकेच्या वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यांबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी वॉर रूममधील ०२३१-२५४२६०१,२५४५४७३  या दोन फोन नंबर्सवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. या वॉर रुममध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत.