मुंबई (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे नवे चिन्ह मिळाले. मात्र, यावर समता पार्टीने आक्षेप घेतला होता. राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटांकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे, तर मशाल हे चिन्ह आणि शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले होते.

मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली. यानंतर समता पार्टीने दोन जजेसच्या बेंचकडे ही रिट याचिका केली होती. ठाकरे गटाला मशाल चिन्ह न देण्याची विनंती समता पार्टीने केली होती. याआधी सिंगल जज बेंचने ही याचिका फेटाळल्यावर समता पार्टीन डबल जज बेंचकडे याचिका केली होती. आता डबल जज बेंचनेही याचिका फेटाळल्यामुळे मशाल चिन्ह ठाकरे गटाचेच यावर शिक्कामोर्तब झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला असता तर मुंबईतील पोटनिवडणुकीवर याचा परिणाम होण्याची चर्चा होती; मात्र न्यायालयाने समता पार्टीची याचिका पुन्हा फेटाळल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. समता पार्टीने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.