कोल्हापूर ( प्रतिनिधी ) हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख म्हणून तब्बल 19 वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या मुरलीधर जाधव यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी करण्य़ात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत जाधव यांनी विरोध केला होता. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी शेट्टी यांना विरोध करताना म्हटले की, शेट्टी यांनी वारंवार भूमिका बदलत शिवसेनेला फाट्यावर मारले, ही खदखद बोलून दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेने जाधव यांच्यावर कारवाई करत जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. निष्ठावंत शिवसैनिकाला मातोश्रीवरून अशी वागणूक दिल्यानंतर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान उद्या दि. 5 जानेवारी रोजी जाधव पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तब्बल 19 वर्षे जिल्हाप्रमुख पदावर काम करत होते. ठाकरे कुटुंबाशी अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाला अप्रत्यक्ष विरोध केल्याने ही कारवाई केली आहे.