अमरावती : ‘धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, रवी राणा यांने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. बच्चू कडू तर काहीच नाहीत. जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे,’ असे वक्तव्य अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद संपला असे जाहीर झाल्यानंतर आज रवी राणांच्या वक्तव्याने आता हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

रवी राणा हा एकदा नव्हे तर दहा वेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमक आहे. पहिल्यांचा चुकी केली म्हणून माफी करतोय असं सांगत मंगळवारी आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आज त्या टीकेला रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रवी राणा यांचे स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन तयार राहतो. मी कुठल्या चौकात यावं हे सांगावं, मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. मी मंगळवारी बोलताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे राणांच्या या वक्तव्याची दखल मी घेत नाही. असं ते म्हणाले. यासंबंधी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचंही बच्चू कडू म्हणाले.

कोण निवडून यायचे हे मतदार ठरवतील. त्यामुळे जनता ठरवेल की मी निवडून यायचे की नाही, असे बच्चू कडू म्हणाले. पुन्हा या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत असे मी मंगळवारी मी म्हणालो होतो. त्यावेळी मी माझ्या प्रहार संघटनेची भूमिका मांडली होती. त्यावेळी मी रवी राणा यांचे नाव घेतले नव्हते, असेही बच्चू कडू म्हणाले.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केल्यानंतर राणा-कडू हा वाद पेटला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनीही रवी राणा यांना इशारा दिला. नंतर हा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. त्या ठिकाणी वाद मिटल्याचे सांगत रवी राणा यांनी यावर माफीही मागितली होती. मंगळवारी बच्चू कडू यांनी रवी राणा यांना माफ करत असल्याचे सांगत इशाराही दिला होता. त्यानंतर आज रवी राणा यांनी हे वक्तव्य केल्याने हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.