शिरोळ (प्रतिनिधी) : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आ. बच्चू कडू यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रवी राणा यांचा प्रहार जनशक्ती पक्ष व शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने निषेध करण्यात आला. दरम्यान, आ. बच्चू कडू यांचे काम महाराष्ट्र ओळखतो. अशा आदर्शवत नेतृत्वाची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ तहसीलदार डॉ. मोरे-धुमाळ तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सईद पिरजादे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, शिरोळ शहराध्यक्ष किसन चौगुले, नारायण लोखंडे, सादिक बागवान, प्रदीप आयगोळे, समीर नदाफ, फर्जना गवंडी, अमृता भोरे, हर्षदा गोलंदाज, सारिका कांबळे, राजेंद्र प्रधान, मुकुंद काळे, राजू कांबळे यांच्यासह प्रहार संघटना पदाधिकारी सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य शेतमजूर, शेतकरी, दिव्यांग यांच्यासाठी विधानसभेत आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आ. बच्चू कडू करीत आहेत. रवी राणा हे खोटेनाटे आरोप करून आ. बच्चू यांना बदनाम करीत असल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावत आहेत. रवी राणा हे सामाजिक शांतता व संविधानिक लोकशाही बिघडविण्याचे काम करीत असल्याने राणा यांचा निषेध करतो. मात्र काही समाजकंटक सोशल मीडियावरून विडंबनात्मक ध्वनिमुद्रीत करून आ. बच्चू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत आहेत. यामधील दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.