कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगांव येथील सौ. एल. एस.पाटील रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करून अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश आज पुरवठा विभागाने दिले. कोरोना काळात सरकारने दिलेले धान्य वाटप परस्पर हडप करत असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडच्या रेशन दक्षता समितीचे अध्यक्ष माजी सैनिक निवृत्ती कुरणे यांनी दिली होती. एकूणच प्रकरणाची चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी कारवाईचे आदेश दिले.

गिरगांवमधील या रेशन दुकानाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. दुकानदारांकडून मयत, परगावी असणारे लाभार्थी तसेच रेशन कार्डवरील एकूण नावे आणि ऑनलाइन नावे यामध्ये तफावत आढळून येत होती. कोरोना काळात केंद्र सरकारकडून मिळालेल्या धान्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणावर आल्या होत्या. संभाजी ब्रिगेडने या तक्रारींची दखल घेत पुरवठा विभागाकडे चौकशीची मागणी केली होती.

त्यानुसार प्रत्यक्ष दुकानात भेट देऊन तपासणी केली असता दुकानांमध्ये अनधिकृतरित्या धान्याचे वाटप करणे, कोरोना काळातील धान्य वाटपाच्या पावत्यात खाडाखोड करणे, शिधापत्रिकेतील नावे परस्पर वाढवणे अथवा कमी करणे यामध्ये तहसीलदार ऑफिसला न कळवणे आशा गोष्टी प्रथमदर्शनी दिसून आल्या. त्यानंतर एकुणच प्रकरणाची गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर या रेशन दुकानातून जानेवारी २०२० ते मे २०२० च्या पावत्यांमध्ये खाडाखोड करणे. असा ठपका ठेवत अनामत रक्कम जप्त करून पुढील आदेशपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जवळच्या दुकानांत या दुकानातील ग्राहकांना जोडावे या आदेशात म्हटले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सुहास चव्हाण, प्रकाश पाडळकर, हरी पाटील, दशरथ जाधव,   एकनाथ पाटील, शांताबाई पाटील, सचिन कदम, सुरेश साळोखे, रोहित खंडागळे, मोहन मेढे, सागर शिंदे, सुरेश पाटील उपस्थित होते.