नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे देशभरातील शेतकरी २६ व २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसदेसमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास देशभरातील असंख्य शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दिल्लीत आज (मंगळवार) विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधीना याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले की, सध्या पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध करत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. ५ नोव्हेंबर रोजी देशभरात दुपारी १२ ते ४ या वेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारचे ‘काॅर्पोरेट कल्याण’ हे धोरण असल्याने शेतीमाल खरेदी करण्यासाठी हमीभाव बंधनकारक असल्याचे कुठेच उल्लेख केला गेला नाही. म्हणूनच देशातील जवळपास ३०० हून अधिक संघटना एकत्रित येऊन या कायद्याविरोधात संसदेवर २६ व २७ रोजी ‘चलो दिल्ली’चा नारा देत धडक देणार आहेत.
दिल्लीतील बैठकीस व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, गुरूनाम सिंग, बलविरसिंग राजेवाल, मेधा पाटकर, अशोक ढवळे आदी उपस्थित होते.