रत्नागिरी ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी आपल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देत “माझ्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. माझी चौकशी करा. मला अटक करा, पण मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र मागे असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना साळवी म्हणाले की, मला निकालाची पर्वा नाही, असेही साळवी म्हणाले. माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल होणे दुर्दैवी असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला आहे.

आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी, राजापूर आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राजन साळवी हे आतापर्यंत सहा वेळा एसीबीच्या तपासासाठी अलिबागच्या कार्यालयात हजर झाले आहेत.

या कारवाईनंतर राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान राजन साळवी यांची मालमत्ता त्यांच्या उत्पन्नापेक्षा 118 टक्क्यांनी जास्त असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.