कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२२ नवीन वर्षात ‘आपलं लक्ष्य वीस लक्ष २०२२’ गोकुळ संदर्भित दिनदर्शिकेचे प्रकाशन आज (मंगळवार) संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच संचालक, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात करण्यात आले.

या दिनदर्शिकेमध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्धिष्ठ पूर्ण करण्यासाठी जातिवंत जनावरांचे पालन पोषण, गोठा व्यवस्थापन,आहार संतुलन, महालक्ष्मी पशुखाद्य वापर, जंत निर्मूलन आणि लसीकरण, प्राथमिक दूध संस्था व्यवस्थापन आणि संघाच्या विविध योजना विषयांवर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.

यावेळी विश्वास पाटील यांनी, दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ आपली दिनदर्शिका प्रसिद्ध करीत असते. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनांना ग्राहकांची विशेष मागणी आहे. यासाठीच अनेक प्रयत्नांपैकी प्रबोधनात्मक दिनदर्शिका हा एक भाग आहे. यातील दूध उत्पादक हाच सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने त्याला केंद्रित ठेवूनच ही दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच दूध संस्थाना या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले,बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.