कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेत कार्यरत असतांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे देय असना-या मदतीचे प्रस्ताव तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. तसेच एचआरटीसी रुग्णांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी आवश्यकते प्रयत्न करावेत असे महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी सांगितले.
यावेळी महापालिकेचे कोरोनामुळे नऊ कर्मचा यांचे मृत्यू झाले असून कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहा जणांचे प्रस्ताव शासनामार्फत विमा कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत. उर्वरीत तीन कर्मचारी यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन ते ही प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात येतील. तसेच कोरोना पॉझिटीव्ह कर्मचारी यांचे वैद्यकीय बिल रियंबर्समेंट द्वारे महापालिका देईल, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
महापौर म्हणाल्या की, शहरात कोरोना, डेंग्यू, चिकन गुणीया अशा संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणी, फॉगींग, हॅन्ड पंपाद्वारे फवारणी तसेच अन्य स्वच्छतेचा कार्यक्रम आरोग्य विभागाने गतिमान करावा. या कार्यक्रमाची अंमलबजावणीचे दैनदीन नियोजन करावे अशी सुचना महापौर आजरेकर यांनी केली.
डेंग्यू, चिकण गुणीया रोखण्यासाठी औषध फवारणी बरोबरच शहरात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात यावी अशी सुचना महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली.
या बैठकीला आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील आदी उपस्थित होते.