कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी काम केले. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा प्रमुख म्हणून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असेही ते म्हणाले. ते कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले की, करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा १,४०० कोटींचा विकास आराखडा, शेंडापार्क मधील १,१०० कोटींचे एक हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल यासह कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. सात मे रोजी मतदान झाल्यानंतर आम्ही केडीसीसी बँकेचे संचालक मंडळ सहलीसाठी स्वखर्चाने परदेश दौऱ्यावर जाणार आहोत. तुम्ही रेल्वे बुक करा प्रभू श्री. रामाच्या दर्शनासाठी आयोध्यालाही जाण्याचे आश्वासन दिले.

खा. संजय मंडलिक म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापुरात विमानतळ, दळणवळण, रेल्वे या महत्त्वाच्या सेवा- सुविधा यांचे आधुनिकीकरण करण्यात यश मिळाले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे आम्हा सर्वांनाच आणि मलाही आदरणीयच आहेत. माझी लढाई त्यांच्याशी नाही. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत. शेवटपर्यंत आपण निवडणुकीसाठी उभारणार नाही, असेच ते मला सांगत होते. परंतु, संधीसाधूनी मुद्दामहून त्यांना उभं केलयं. कोल्हापूरच्या गादीचा जरूर मान- सन्मान ठेवूया. परंतु; कोल्हापूरकर म्हणून आमचाही आत्मसन्मान असल्याचे सांगितले.

तसेच आदिल फरास यांनी, ना. मुश्रीफांनी या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका आता तुम्हालाच पार पाडून निवडणूक जिंकावी लागणार असल्याचे सांगितले.

भाषणात संजय मंडलिक म्हणाले, रात्री उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळीच करवीर निवासिनी श्री. अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. यावेळी महाडिक मला म्हणाले, तुझ्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, त्यांना धरून रहा. मग काळजीच करू नको, तुझा विजय निश्चित आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर- केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष रेखा आवळे, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण, महेश सावंत, रमेश पोवार, राजेश लाटकर, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, प्रकाश पाटील, प्रकाश कुंभार, सतीश लोळगे, संभाजी देवणे, शारदा देवणे आदी उपस्थित होते.