गगनबावडा (प्रतिनिधी) : येथील गगनगडावरील हजरत गैबीपीर व श्री विठ्ठलाई देवीचा उरूस-उत्सव गुरुवारी (दि.१२) होत आहे. या उरूस-उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाई देवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंगरंगोटी शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गलेफ मिरवणूक गगनगडावर नेण्यात येणार आहे. प्रमुख मार्गावरून फिरून ही मिरवणूक गगनगडावर जाणार आहे. रात्री आठ वाजता गलेफ दर्ग्यातील तुरबतीवर अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाई देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गैबी दर्ग्याचे मुजावर रफिक काझी, अल्फाज काझी व फिरोज काझी यांच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी संदल चढविण्यात येणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. उत्सवाचा मुख्य दिवशी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी गगनगड देवस्थानच्या वतीने बापूसाहेब पाटणकर, नीलराजे पंडित बावडेकर सरकार यांच्या हस्ते मानाचा गलेफ अर्पण केला जातो. हजारो भाविक या उत्सवासाठी येथे उपस्थिती लावतात. प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या उरूस-उत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी रफिक काझी यांनी दिली.