कळे (प्रतिनिधी) : मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण असणाऱ्या चैत्र गुढी पाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे (ता.पन्हाळा) येथे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह असून सणानिमित्त बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरु असल्याचे दिसत आहे. 

कोल्हापूरच्या पश्र्चिम भागातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे येथील विविध दुकानांमध्ये गुढी पाडव्यानिमित्त खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. विशेषतः कपडे व सराफ दुकानांमध्ये खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. तसेच लग्नसराई व पावसाळा तोंडावर असताना खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे. गुढी उभा करताना गुढीसाठी तांब्या, नवीन कापड, चाफ्याची फुले, कडुनिंबाची पाने व साखेरची माळ बांधण्याची पूर्वापार परंपरा आहे.

कळे बाजारपेठेत साखरेची माळ तयार करण्याची गेल्या अनेक दशकांची परंपरा सादुले कुटुंबीयांनी जपली आहे. येथील साखरेच्या माळेला पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडीसह करवीर व राधानगरीच्या काही भागात भरपूर मागणी आहे. एकंदरीत गुढीपाडवा सणामुळे कळे बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी एकच गर्दी झाली असून व्यापारी, दुकानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे दररोज लाखों रुपयांची उलाढाल होतेय.