धामोड (प्रतिनिधी) : तीन महिन्यापूर्वी सुनील गंगाराम घुरके या ११ वर्षाच्या मुलाचा रूग्णालयात वेळेवर पोहोचता न आल्याने सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आज (गुरूवार)  पहाटे साडेचार वाजता भागूबाई राजाराम घुरके (वय २६ रा. म्हासुर्लीपैकी मधला धनगरवाडा) या गरोदर महिलेचा झोल्यातून नेताना  प्रसुतीच्या असह्य वेदनेने मृत्यू झाला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दोघांचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागल्या आहेत.  

राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ग्रामपंचायतीमध्ये सहा धनगरवाडे येतात. पण हे धनगरवाडे विकासकामापासून कोसो दूर आहेत. रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सोयीसुविधांची अद्यापही येथे वानवा आहे. रस्त्याची सोय नसल्याने रूग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी झोल्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावतो. एखादा रूग्ण किंवा गरोदर स्त्रीला खाटूला अथवा झोल्यातून मुख्य रस्त्यावर आणावे लागते. तेथून पुढे पन्नास किलोमीटरचा कोल्हापूर चा प्रवास वेगळाच. वेळेत उपचार न मिळाल्याने तीन महिन्यांपूर्वी सुनील गंगाराम घुरके याचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. आता भागुबाई घुरके या गर्भवतीचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.

इतर विकासकामे सोडाच येथे दळणवळणाची सोय अद्याप  पोहोचलेली नाही.   म्हासुर्लीच्या चौकात निवडणुकीच्या प्रचारसभेत आजपासून विकासकामांसाठी हे धनगरवाडे आम्ही दत्तक घेतल्याचे छाती बडवून आमदार, खासदार सांगतात. पण नंतर सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतात. आता दोन बळी गेल्यानंतर आमदार  खासदारांनी या धनगरवाड्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास मलगुंडे यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना केली.