कोल्हापूर (प्रतिनिधी) : जातीय द्वेषातून जाणीवपूर्वक त्रास देऊन व्यवसाय बंद पडणारे पोर्ले तर्फे ठाणे येथील ग्रा.पं. सदस्य शहाजी खुडे यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी सारिका जाधव महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

सारिका जाधव यांनी पोर्ले तर्फे ठाणे या गावामध्ये गट नं. ९३७ जागेवरती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चप्पल विक्रीचे छोटेसे दुकान सुरु केले होते. पण काही लोकांनी गेल्या ५ वर्षांपासून त्यांचे दुकान कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता काढून टाकण्याचे प्रकार केले आहेत. तसेच यावर्षी जुलै महिन्यात परत एकदा कोणतीही पूर्व सूचना न देता जीसीबीच्या सहाय्याने त्यांचे दुकान आणि दुकानात असणारा सव्वा लाखांचा माल इथले ग्रामसेवक आणि कांही मंडळीनी मोडतोड करून जप्त केले.

सारिका जाधव यांनी या प्रकाराबाबत पन्हाळा तहसील कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला सुद्धा होता. परंतु, यावर कोणताही निर्णय घेतला नाही. उलट जाधव यांना त्रास देण्याच्या हेतूने वेगवेगळ्या मार्गाने पोलीस आणि ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. जाधव यांनी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. याला रिपाईने पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना शिष्टमंडळाने भेट दिली असता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सारिका जाधव यांनी हे उपोषण मागे घेतले.