पुणे ( वृत्तसंस्था ) लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बिनधास्तपणे बोलत शेतकऱ्याची स्थिती आणि वास्तव यावर भाष्य केले. मकरंद अनासपुरे हे लवकरच ‘नवरदेव बी एस सी अ‍ॅग्री’ या चित्रपटात दिसणार आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनुभव सांगितले. शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे मात्र त्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. इंडियाचं काहीतरी वेगळं सुरू आहे आणि भारताचं काहीतरी वेगळं सुरू आहे. अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्याची व्यथा मांडली.

पुढे बोलताना अनासपुरे म्हणाले हे सगळं मी अलीकडच्या काळात जास्त ऐकायला लागलोय. पूर्वीच्या काळात असं नव्हतं. पूर्वीच्या काळात सगळ्यात जास्त धनसंपन्नता ही शेतकऱ्यांकडे होती. सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा शेतीला दिला जायचा. शेती नंतर व्यापार आणि सगळयात निम्न ही नोकरी होती. पण मग आता नेमकी उलटी अवस्था झाली. अस्मानी संकट तर आहेच आणि सुल्तानी पण आहेच.

दोन्ही बाजूनी शेतकरी पिचला गेला आहे.त्याच्यामुळे दिवसेंदिवस आणखी बिकट परिस्थिती होणार आहे. ग्रामीण भाग हा आपल्या माध्यमांनी अगदी बाहेर काढून टाकला आहे. त्याच्या बातम्याच येत नाहीत त्यामुळे याभागातील भीषण सत्य समाजासमोर येत नसल्याची स्थिती असल्याचं ही ते म्हणाले.