कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुदत संपलेल्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील ४३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पण आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने प्रलंबित निवडणुका घेतल्या जात आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० कालावधीत मुदत संपलेल्या कोल्हापूरसह राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. १२ डिसेंबरला तहसीलदारांनी निवडणुकीचे नोटीस प्रसिद्ध करणे, २३ ते ३० डिसेंबरअखेर उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे मागवणे, ३१ डिसेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी, ४ जानेवारीला नामनिर्देशन पत्रे मागे घेणे, १५ जानेवारीला मतदान, १८ जानेवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.