पुणे  (प्रतिनिधी) : वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी  आत्महत्या केल्याने पुणे शहर पोलीस दलात  खळबळ उडाली आहे.  चव्हाण यांनी विश्रांतवाडी येथील शांतीनगर परिसरातील राहत्या घरी ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास समोर आला. आत्महत्त्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत  असणाऱ्या चव्हाण यांनी भरोसा सेलमध्ये चांगले काम केले होते.  लॉकडाऊनमध्ये त्यांनी अनेक लोकांना मदत  केली होती. ‘ई पास’ची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मनमिळावू असणाऱ्या चव्हाण यांची पोलीस दलात शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.