कागल (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या ग्रा.पं. पैकी कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून राष्ट्रवादीला पाठबळ दिले. या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयाचे महाद्वार उघडले आहे, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.

पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकनियुक्त सरपंच शीतल नवाळे यांच्यासह उपसरपंच सदाशिव चौगुले व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक युवराज पाटील होते. सुरुवातीला फिल्टर हाऊसचा पायाभरणी व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला.

कागलच्या शछत्रपती शाहू साखर कारखान्यालगत असलेल्या या गावात दबावातून शेतकऱ्यांची वाहने बंद केली. शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबाव आणला. हे सगळे झुगारून ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या शीतल अमोल नवाळे यांना सरपंच केले. या विजयामुळे माझी छाती अभिमानाने फुगली आहे, असेही ते म्हणाले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, पिंपळगाव खुर्द हे छत्रपती शाहू साखर कारखान्यालगतचे गाव. लोकनियुक्त सरपंच निवडणुकीमध्ये विरोधकांनी दबावतंत्रासह आमिषे आणि पैशाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. हे सगळेच जुगारून ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल अमोल नवाळे यांना मोठ्या बहुमताने विजयी केले. ग्रामस्थांच्या या स्वाभिमानाला सलाम.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, आमदार आणि ग्रामविकासमंत्रीपदाच्या माध्यमातून मुश्रीफ यानी सर्वांगीण विकास केलेला आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पिंपळगाव खुर्दच्या रूपाने पहिलीच ग्रामपंचायत राष्ट्रवादीला मिळालेली आहे. गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, पिंपळगाव खुर्द ग्रा.पं. मध्ये पहिलाच झेंडा राष्ट्रवादी काँग्रेसने फडकवण्याचा निश्चितच मोठा अभिमान आहे.

जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, आमदार मुश्रीफ यांच्या कामाला मिळालेला हा कौल आहे. कागलच्या शाहू साखर कारखान्यालगतचे हे गाव असतानाही इथल्या ग्रामस्थांनी दबाव आणि आमिषे झुगारून कामाला न्याय दिलेला आहे. विरोधकांनी आम्ही केलेल्या कामांचा श्रेयवाद न मांडता काम करावे आणि मगच सांगावे.

यावेळी एम. आर. चौगुले, भिवा आकुर्डे, जे. डी. कांबळे यांचीही मनोगते झाली. केडीसीसी बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, महेश चौगुले, रमेश तोडकर, शिवाजीराव घाटगे, महेश घाटगे, कृष्णा तेलवेकर, सर्जेराव तेलवेकर, रामचंद्र मगदूम, संतोष मगदूम आदी उपस्थित होते. स्वागत अशोकराव नवाळे यांनी केले. प्रास्ताविक नूतन ग्रा.पं. सदस्य आसिफ शेख यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केले. युवराज मोरे यांनी आभार मानले.