पेठवडगांव (प्रतिनिधी) : तब्बल सात महिने बंद असलेला वडगावचा सोमवारचा आठवडी बाजार (दि. २६) पासून सुरु होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाच्या प्राप्त आदेशानुसार पुनश्च: प्रारंभ अभियान अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन जनावरांच्या बाजारासह स्थानिक आठवडी बाजार सुरु करण्याला परवानगी देत असल्याचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी आणि मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी सांगितले.

तब्बल सात महिन्यानंतर सुरु होत असलेल्या बाजारामुळे पेठवडगाव शहरातील छोट्या व्यावसाईकांचे अर्थचक्र गतिमान होणार आहे. यासाठी काही मागदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक विक्रेत्यांने मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड आणि ग्लोव्हज वापरणे बंधनकारक आहे. नो-मास्क नो गुडस, नो मास्क नो सर्व्हीस तसेच नो-मास्क – नो एंट्रीचे फलक लावणे व्यापारांना बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यापाऱ्यांनी बाजारात विक्रीला बसू नये. नागरिकांनी बाजारामध्ये अनावश्यक गर्दी करु नये, सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये. तर सर्व नागरीकांनी बाजारात येताना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. ६० वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व लहान मुले यांनी बाजारात प्रवेश करु नये. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, गुटखा, तंबाखू, मावा प्रतिबंधीत असणार आहे.

ज्या व्यापारी आणि नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याची सर्व नागरीक आणि व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पेठवडगांवचे नगराध्यक्ष  मोहनलाल माळी, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी केले आहे.