उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकार तसेच लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला.
छत्रपती संभाजीराजे वेगवेगळ्या भागांना भेटी देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावाला त्यांनी भेट दिली. गावातील विहिरींचे कठडे तुटले आहेत. तसेच फळबागा, सोयाबीन, तूर पूर्णपणे वाहून गेली आहे. या नुकसानीची संभाजीराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यांमांशी संवाद साधला.
खा. संभाजीराजे छत्रपती यांनी, सरकार आणि लोकप्रतिनिधींना चांगलेच फटकारले. राज्यातील शेतकरी पिचला असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना मदत केली नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.