अमेठी : लोकसभा निवडणूकीचे  वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल  लोकसभा मतदारसंघ मानला जाणारा अमेठी मतदारसंघ आता चर्चेचा विषय ठरला आहे. अमेठीमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच या मतदारसंघात पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. अमेठीतील जनतेची राहुल गांधींना नाही तर रॉबर्ट वाड्रा यांना पसंती असल्याचं दिसून येत आहे.

या मतदारसंघातून रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पोस्टर अमेठी आणि गौरीगंजमधील काँग्रेस कार्यालयासह इतर ठिकाणी झळकत आहेत. “अमेठी की जनता करें पुकार, रॉबर्ट वाड्रा  अबकी बार’, निवेदक अमेठी की जनता.”असे पोस्टरवरती लिहिले आहे.

याआधीही सोशल मीडियातून वाड्रा यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली होती.आता अमेठीत पोस्टर लावून रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अमेठी आणि गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालय, हनुमान तिराहा, रेल्वे स्टेशन रोड आणि रेल्वे स्टेशनसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोस्टर लावण्यात आले आहेत.

राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवू नये, असे काँग्रेसच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष सोनू सिंह रघुवंशी म्हणाले.या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या फरकाने निवडणूक जिंकेल आणि केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी निवडणुकीत पराभूत होतील, असा विश्वास सोनू सिंह रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.