मुंबई/प्रतिनिधी : रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा माढा लोकसभेची उमेदवारी दिल्याने नाराज असलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातून धैर्यशील मोहिते पाटलांची माढ्यातून उमेदवारीही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती होती. पण यावेळी उमेदवारी जाहीर झाली नाही. 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर 16 तारखेला ते शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असून शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिल्यानंतर त्याला धैर्यशील मोहिते-पाटलांनी विरोध केला होता. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण भाजपने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या दरम्यान मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. अखेर आज धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. तर 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश
दरम्यान, धैर्यशील मोहिते-पाटील हे 13 एप्रिलला शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 13 एप्रिलला विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांचा 13 एप्रिलला प्रवेश होऊ शकणार नाही. तर 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश करणार असून 16 तारखेला शक्तिप्रदर्शन करत मोहिते पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत होणार असल्याचं बोललं जातंय.