कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम करवीर तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी आपल्या गावात मोहिमेची प्रचार, प्रसिद्धी करुन गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी केले. यावेळी त्यांनीउजळाईवाडी येथे भेट देऊन आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीत सहभाग घेतला.

तहसिलदार म्हणाल्या की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेतून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोरोना, इली आणि सारीच्या संशयित रुग्णांबरोबरच अन्य आजार असलेल्या रुग्णांची माहितीही संकलित केली जात आहे. करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत २४४ आरोग्य पथके गठीत करण्यात आली आहेत. पथकामार्फत तालुक्यातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

एका आरोग्य पथकामध्ये आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि अरोग्य सेवक या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य पथकामध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.