नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा भारताविरोधात मोठा दहशतवादी कट रचण्यास सुरुवात केली आहे. यावेळी या संघटना हमासच्या दहशतवादी हल्ल्यापासून प्रेरित आपले नवे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.

सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल-हमास संघर्षाच्या सुरुवातीपासून, लष्कर आणि जैश या दोन्ही संघटना भारतासोबतच्या नियंत्रण रेषेवर ( एलओसी ) त्यांच्या आक्रमक कारवाया तीव्र करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर घुसखोरीतही वाढ झाली असल्याची स्थिती आहे.

हमास शैलीत हल्ल्याची तयारी !

उच्च गुप्तचर सूत्रांच्या मते, भारतासाठी मोठी चिंतेची बाब म्हणजे लष्कर आणि जैश जम्मू-काश्मीरमध्ये हमास स्टाईल हल्ले करू शकतात. काश्मीरमध्ये 60 हून अधिक विदेशी दहशतवादी थांबले असून त्यांच्या ठिकाणांबाबत सध्या कोणतीही माहिती नाही, असे सूत्रांनी सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत सीमेवरील दहशतवाद्यांनी 2019 सारख्या सर्जिकल स्ट्राईकच्या अपेक्षेने त्यांचे लॉन्चिंग पॅड बदलले आहेत. लाँचिंग पॅड भारतीय एजन्सींच्या नजरेपासून दूर वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आहेत.