कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय आणि हॉलमधील एकूण क्षमतेपैकी निम्म्या आसन क्षमतेच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मिळावी किंवा किमान ५०० लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमास मान्यता असावी. यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी ऑल महाराष्ट्र टेंन्ट डिलर्स असोसिएशनतर्फे २ नोव्हेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे चेअरमन व माजी महापौर सागर चव्हाण व व्हाईस चेअरमन तुकाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यापासून मंडप, लॉन, मंगल कार्यालय व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. या गोष्टींचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करुन या क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांच्या मागण्या मान्य कराव्यात. २ नोव्हेंबरपर्यंत सरकारने मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशाराही चेअरमन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन पाटील यांनी दिला. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे पाठविले जाईल. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या ८० हजार ते १ लाखाच्या आसपास आहे. व्यावसायिकांच्या समस्या संबंधी महाविकास आघाडीचे नेते, मंत्री, खासदार, आमदार यांची भेट घेतली पण प्रश्नांची काही सोडवणूक झाली नाही.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे खजानिस विजय सुर्यवंशी, सचिव सुनील व्हनागरे, नियाज पटवेगार, विनायक सुर्यवंशी, मुसाभाई शेख, इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे शाम बासराणी, कॅटरिंग असोसिएशनचे महावीर सन्नके, लाईट-साऊंड असोसिएशनचे उदय चव्हाण आदी उपस्थित होते.