कोल्हापूर (प्रतिनिधी) : केनेल क्लब ऑफ इंडियाच्यावतीने कोल्हापूरात 26 नोव्हेंबर रोजी डॉग शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये देशभरातून तब्बल 350 ते 400 स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर नामवंत जातीचे रुबाबदार श्वान पाहण्याची सुवर्णसंधी या शोच्या निमीत्ताने कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे.


या शो मध्ये डॉबरमन, ग्रेट डेन, जर्मन शेफर्ड, सायबेरियन हस्की, गोल्डन रीट्रीवर, लॅब्राडोर, बिगल अशा विविध 50 हून अधिक जातीचे श्वान पाहायला मिळणार आहेत. शिवाय या शो चे खास आकर्षण असणार आहेत भारतीय जातीचे श्वान ज्यामध्ये कारवान हाऊंड, मुधोल हाउंड, राजपालयम यासारखे दुर्मिळ श्वान सहभागी होणार आहेत. हा शो प्रेक्षकांसाठी मोफत असून जास्तीत जास्त लोकांनी शो पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत कोल्हापूर जवळच्या गडमुडशिंगी येथील अभिषेक इंडस्ट्रीजच्या प्रांगणात हा डॉग शो होणार आहे. तसेच कोल्हापूरातील जवळपास 150 श्वान या स्पर्धेत भाग घेत आहेत. एकूणच हा डॉग शो म्हणजे श्वान प्रेमींसाठी पर्वणीच असून या शोला आबालवृद्धांनी उपस्थिती लावावी असे आवाहन संयोजकांनी पत्रकार परिषदेत केले.


या पत्रकार परिषदेला अनिरुद्ध जाधव, मनोज वाघमोडे, रोहित जाधव, प्रशांत मालवाडे, सुशील माताडे, समर्थ कशाळकर उपस्थित होते.