मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी निश्चित झाली आहे.   राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे  यांचे नांव यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनी  त्यांना आमदार करण्यास विरोध केला आहे. दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन  खडसे यांचा नावाला विरोध केला.

खडसें यांचे नाव यादीत येणे हे संतापजनक आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा एकदा राजकारणात आणले जात आहे. खडसे हे पुन्हा जर राजकारणात सक्रीय झाले तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे.  खडसे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. पण त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोर्टात आणखी लढा द्यावा लागणार आहे.  खडसे यांच्याविरोधात आणखी पुरावे गोळा करणार असून ते राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे देणार आहे, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात बळ वाढणार आहे. पक्षाचा विस्तार होण्यासाठी खडसेंना राजकारणात सक्रिय करण्यासाठीच त्यांना आमदारकीची बक्षिसी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.