गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विरोधक जाहीर सभांमधून व्यक्तिगत निंदा-नालस्ती आणि कुचाळक्या करीत आहेत. त्यापेक्षा शेतकरी सभासदांसाठी कारखाना वाचवण्यासाठी आणि कामगारांसाठी काय करणार आहोत ते सांगा, अशी विचारणा प्रकाशराव चव्हाण यांनी केली आहे. छत्रपती शाहू शेतकरी सर्व विचार आघाडीच्या भडगाव, ता. गडहिंग्लज येथील जाहीर प्रचार सभेत चव्हाण बोलत होते.

प्रकाशराव चव्हाण म्हणाले, विरोधकांकडे विधायक दृष्टिकोनच नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्या अवस्थेतच ते काहीही वल्गना करीत आहेत. आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले,३२ वर्षे संचालक द व त्यापैकी २१ वर्षे अध्यक्षपद असताना ४६वर्षांपूर्वीच्या या कारखान्याची एक वीट किंवा दगड सुद्धा बदलता आलेला नाही. सभासद शेतकऱ्यांनी विरोधकांना पायउतार करावे. डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, दीड महिन्यात कारखाना फायदा आणतो म्हणणाऱ्या अध्यक्षांनी मग वीस वर्षात डबऱ्यात कसा घातला? हा खरा प्रश्न आहे. विरोधकांनी कारखाना मुळासकट खाऊन टाकला असा आरोपही त्यांनी केला.

शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर म्हणाले, आमदार राजेश पाटील यांचे जवळचे सहकारी अभय देसाई अडकूरकर गडहिंग्लज बाजार समितीचे अध्यक्ष होते. बाजार समितीची दीड एकर जमीन आम्ही शेतकऱ्यांच्या कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊससाठी मागत होतो. ती जमीन शेतकऱ्यांना न देता अध्यक्ष अभय देसाई यांनी शिवाजीराव खोत यांना दानच देऊन टाकली आहे. याचा जाहीर जाबही विचारू. आमदार पाटील यांना त्याचे उत्तर द्यावेच लागेल.

ग्रामविकास मंत्रीपदाच्या काळात आ. हसन मुश्रीफ यांनी आजी-माजी सैनिकांच्या मालमत्ता कर माफीचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल गावातील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने आमदार मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला.