जोहान्सबर्ग  : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात तमिळनाडूच्या सलामीवीर साई सुदर्शनला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या 22 व्या वर्षी साईला आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 400 वा खेळाडू ठरला. साई सुदर्शनने नाबाद अर्धशतक (५५ धावा) झळकवले.

 दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय त्याच्याच पथ्यावर पडला असून, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ 116 धावा करता आल्या असून, भारताच्या यंग ब्रिगेडने पहिल्याच सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.3 षटकामध्ये 116 धावांतच गुंडाळला. भारताकडून अर्शदीप सिंगने पाच, तर आवेश खानने चार गडी बाद केले. कुलदीप यादवला एक बळी मिळाला.

फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकातच अर्शदीप सिंगने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला बोल्ड केले. चेंडू त्याच्या बॅटला लागून स्टम्पवर जाऊन आदळला. रिझाला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी व्हॅन डर डुसेनला पायचित केले. त्याला खातेही उघडता आले नाही. अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली. 

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ४०० वा खेळाडू साई सुदर्शनने संधीचं सोनं केले. त्याने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरसह भारताला विजय मिळवून दिला. त्याने ४१ चेंडूंत पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. श्रेयसनेही ४४ व्या चेंडूवर षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. विजयासाठी ६ धावांची गरज असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस (५२) झेलबाद झाला आणि साईसह त्याची ८८ धावांची भागीदारी संपुष्टात आली. भारताने १६.४ षटकांत २ बाद ११७ धावा करून विजय पक्का केला. सुदर्शन ४३ चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला.