कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२३” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी तपोवन मैदानावर अलोट गर्दी केली. यावर्षीचे प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे.

या प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॉल, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला, फुले, शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे. प्रदर्शनात एकूण अडीच कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.

तसेच साडेपाच फूट लांब शिंग असलेली १० लिटर दुध देणारी पंढरपुरी म्हैस, राजा नावाचा जाफराबादी रेडा, कमी उंचीची ४ वर्षे वयाची कुंगनूर जातीची गाय, अमेरिकन सिल्क जातीची पायावर केस असलेली कोंबडी,७०हजार रुपये किंमतीचा ९७ किलोचा बोकड,बिटेल जातीचा बकरा,माडग्याळ मेंढा,भारतीय वंशाची जाड शिंग असलेली काँग्करेज जातीची गाय,शाहू नावाचा घोडा,साडेसहा वर्षाचा मसाई पठार येथील नंदी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

तर नृसिंहवाडी बुबणार येथील ८६०३२,ऊस वान व ९०२७,१८१२ ऊसाचे देशी वाण व अर्चना खरोटे यांनी पिकविलेला विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला व माद्याळ येथील हिरवी व लाल मिरची ठरत आहे खास आकर्षण याचबरोबर विविध कँपन्यांची उत्पादने विविध प्रकारची ट्रॅकटर्स मांडण्यात आली आहेत हेही आकर्षण ठरत आहेत.

या प्रदर्शनामध्ये विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या असून यामध्ये गोकुळ दूध संघ व त्यांची उत्पादने,ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ दूध संघ,या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या आहेत.