कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी सावकारी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. पण वरीष्ठ पोलीस अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे याबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

कळेसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर चाललेली असून १० टक्के मासिक दर व्याजाने कर्ज देऊन लोकांची राजरोसपणे लूट होत आहे. अशा खाजगी सावकारांवर अजूनही कारवाई झालेली नाही. त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची शंका व्यक्त होत आहे. तसेच दाखवण्यापुरती किरकोळ घरपण येथील कारवाई वगळता मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारी सुरूच आहे. मात्र त्याकडे अजूनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र आहे.

तसेच अशा सावकारांकडून बळाचा देखील वापर होत आहे. कर्जदारांकडून १० टक्के मासिक दराने रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी यावरून वादाचे प्रसंगही घडत आहेत. तसेच राजकीय वरदहस्त आणि पाठीशी असलेला कायदा यामुळे हे सावकार लोकांच्या असहायतेचा फायदा घेत आहेत. त्यामुळे याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करावी आणि लवकरात लवकर अश्या घटनांवर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.