पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या १० तारखेला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या बंदला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करू नका, अशी विनंती केली. त्यांनी विनंती मान्य केली.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी बिनडोक भूमिका मांडली. भाजपने अशा नेत्याला राज्यसभेत पाठवलेच कसे ? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.