पन्हाळा ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असुन शासनाच्यावतीने सुप्रीम न्यायालयात क्युरेटीव्ह याचीका लवकरच दाखल करुन समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने उपोषण कर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. तथापी उपोषण कर्त्यांनी ती अमान्य केली आहे.


सविस्तर वृत्त असे की, पन्हाळा तहसीलदार कार्यालयाजवळ जाफळे ता. पन्हाळा येथील वसंत रंगाराव पाटील व सुरेश चंदर जगदाळे दोघांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या आज तिसऱ्या दिवशी आमदार डॉ. विनय कोरे, जनसुराज्य पक्षाचे जनसंपर्क अधिकारी अॅड. राजेंद्र पाटील, बहीरेवाडीचे सरपंच रविंद्र जाधव व मान्यवरांच्या समवेत उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे- जाधव यांनी उपोषणकर्त्यांना भेटून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

त्याचबरोबर आमदार डॉ. विनय कोरे यांनी उपोषणकर्त्यांना शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना आपल्या उपोषणाबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले. तसाच संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिला आसल्याचे सांगितले आहे.

आमदार कोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता उपोषणकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोघे जण उपोषणाला बसलो आहे. त्यामुळे मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले.