कागल (प्रतिनिधी) : बिळात लपलेले विरोधक सत्ता संघर्षानंतर बाहेर पडलेत. त्यांना माझे विधायक काम पटले आहे.  त्यामुळेच मी सुरू केलेल्या योजना ते राबवित आहेत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांच्या कल्याणाच्या या योजना कोणीही राबवीत असले, तरी त्यावर शिक्का मात्र माझाच आहे, असेही ते म्हणाले. तालुक्यातील कसबा सांगाव येथे बांधकाम  कामगारांना सुरक्षा साहित्य आणि अत्यावश्यक साहित्य संचाच्या वाटप कार्यक्रमात आ. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवूनच जनतेच्या विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. आई आणि वडील अशा दोघांनाही एकत्र पेन्शन योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. कसबा सांगावमध्ये तब्बल ३० कोटींची विकासखामे पूर्ण झाली आहेत. १९८० साली माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली होती. त्यावेळी दरमहा अवघे दोनशे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून योजनेमध्ये आमूलाग्र बदल केला. येत्या काळात या योजनेची उत्पन्न मर्यादेची अट २० हजारावरून तीस हजार रुपये करणे, उत्पन्नाचा दाखला वर्षाला देण्याऐवजी तीन वर्षांनी देणे, लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर लाभ बंद होण्याची तरतूद काढून टाकणे, तसेच महिन्याला एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार करणे यासाठी प्रयत्न करणार आहोत.

यावेळी शकील कलावंत, बाळासाहेब लोखंडे, अमर कांबळे, संदीप आवळे, प्रकाश आवळे, मोहन आवळे, बाबू कांबळे, काशीम मुल्ला, रावसाहेब मगदूम, सुरेश लोखंडे, दीपक किणे, दयानंद स्वामी, मेहताब मुल्ला, संतोष माळी आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत सरपंच रणजित कांबळे यांनी, प्रास्ताविक किरण पास्ते यांनी, तर सूत्रसंचालन विनोद कोरे यांनी केले. मेहताब मुल्ला यांनी आभार मानले.