मुंबई (प्रतिनिधी) : पुढील काही महिन्यांत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी कोणी कितीही लॉबिंग करावे, राज्य सरकारने मात्र कोणाला लस प्रथम द्यायची ते ठरवले आहे. सर्वप्रथम आम्ही पोलीस आणि डॉक्टरांना लस देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (मंगळवार) जाहीर केले.

अनेक कंपन्या कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतात ही लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर ही लस सर्वांत आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. याबाबत टोपे यांनी स्पष्ट शब्दांत खुलासा केला आहे.

महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मोर्चेबांधणी करीत आहेत. त्याचप्रमाणे या यादीत आपल्यासह कुटुंबीयांची समावेश करण्यासाठी दबाव आणत आहेत, असाही आरोप होतो आहे. यावर राजेश टोपे यांनी म्हटले की, आम्ही कोणाला लस द्यावयाची याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करीत असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांनाच प्रथम लस दिली जाईल. कोणीही कितीही लॉबिंग केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.