मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली  एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत चौथ्यांदा सत्तेची सुत्रे हातात ठेवली आहेत. आता पुन्हा नितीशकुमार मुख्यमंत्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना सत्ता स्थापन करताना नितीशकुमार यांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, नितीशकुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा.  बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला घ्यावा. नितीश कुमारांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व केले, तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो, असे सामंत यांनी म्हटले आहे. भाजप प्रादेशिक पक्षांना कशा पद्धतीने संपवत असल्याचे हे देशाला पुन्हा एकदा बिहार निवडणुकीतून समजून आले आहे. याचे महाराष्ट्रानंतरचे दुसरे उदाहरण बिहार आहे.