सावरवाडी (प्रतिनिधी) : सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाकरीता  सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकारी चळवळीत आदर्श विचाराने काम करण्याची  गरज आहे, असे  प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांनी आज (बुधवारी) केले.

करवीर तालुक्यातील   शिरोली दुमाला  येथे विविध सहकारी संस्था, ग्रामपंचायत, यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव को. ऑप. बॅंकेचे नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्या आयोजित सत्कार प्रसंगी पाटील बोलत होते. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विकास होण्याबरोबर सहकारात ध्येयवादी विचाराचा प्रसार होणे आवश्यक आहे, जनतेचे हित जोपासण्यासाठी अभ्यासू वृत्ती नव्या पिढीतील कार्यकत्यांनी जपली पाहिजे, असे विश्वास पाटील म्हणाले. प्रारंभी गावातील विविध सहकारी संस्था, ग्रामपंचायत यांच्यातर्फे बँकेचे नूतन अध्यक्ष अनिल सोलापुरे, उपाध्यक्षा रंजना तवटे, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वीरशैव बँकेचे नूतन अध्यक्ष अनिल सोलापुरे म्हणाले, केंद्र शासनाच्या नियमानुसार बँकेचा कारभार सुरू असुन, २ हजार कोटी ठेवी जमा करण्याचा मानस आहे. कार्यक्रमात  माजी सरपंच नंदकुमार पाटील, गजानन पाटील बाजीराव पाटील, रंगराव पाटील, राहुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संस्थेचे सचिव संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. शेवटी मच्छिद्र कांबळे यांनी आभार मानले.

यावेळी  सरपंच रेखा कांबळे, माजी सरपंच एस. के. पाटील, माधव पाटील, अशोक पाटील, बँकेच्या उपाध्यक्षा रंजना तवटे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.