कोल्हापूर ( प्रतिनिधी) : ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर आता शाश्वत संशोधनाची गरज आहे,’ असे मत संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरुण पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातील स्तुति प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या संदर्भात भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय प्रायोजित, स्तुति (सिनरजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) योजनेअंतर्गत ७ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान केले आहे.

प्रा. आर. जी. सोनकवडे‌ यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारतामध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्यापैकी आयआयटी, केंद्रीय विद्यापीठ तसेच विविध संस्थांमध्ये आयोजित केला जात आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता झाले. संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरुण पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात आज-काल कशी शाश्वत संशोधनाची गरज आहे आणि जग कशा पद्धतीने ऊर्जेकरिता वेगवेगळे पर्याय शोधत आहे, यावर भर दिला. संशोधनाचे व्यापारीकरण होऊन जगाला विविध पर्याय उपलब्ध करून देणे हा उद्देश असला पाहिजे’ असे त्यांनी नमूद केले. त्यांनी या सैफ सेंटरचे व प्रा. सोनकवडेंच्या अहोरात्र परिश्रमाचे कौतुक केले. अशाच प्रकारच्या परिश्रमाने काम करून भारतभर शिवाजी विद्यापीठाचे नावलौकिक करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञ सुचिता लोखंडे यांनी स्तुति आणि भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय येथे उपलब्ध असलेल्या विविध योजनांविषयी तपशीलवार माहिती दिली. स्तुतिचे समन्वयक प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सैफ-डीएसटी-सीएफसी केंद्र, शिवाजी विद्यापीठ येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणांविषयी आणि या कार्यशाळेचा भाग म्हणून समाविष्ट असलेल्या विविध विषयांबद्दल तपशीलवार माहिती दिली.

प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी, शिवाजी विद्यापीठ परिसर येथे वेगवेगळ्या सुविधा आणि जैवविविधता या विषयावर भर दिला. डॉ. पी. डी. डोंगळे यांनी स्वागत, तर अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. डी. पवार यांनी आभार मानले.