अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.सत्ताधारी महायुतीने अमरावती मतदाहरसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. राणा या भाजपच्या कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत. परंतु महायुतीचा भाग असलेल्या प्रहार या पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राणा यांना विरोध केला आहे.अमरावती या जागेसाठी आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे.

प्रहारची भूमिका कायम आहे.अमरावतीत प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आमचा स्वत:चा पक्ष आहे.त्यामुळे आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

ज्यांनी भाजपचे कार्यालय फोडले…
आम्हाला सध्या कोणताही सक्षम उमेदवार वाटलेला नसून ४ तारखेपर्यंत त्याचा शोध घेऊ. सर्वांनी एकत्र येऊन झुंडशाही लोकशाहीचे पतन करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याची जबाबदारी घ्यावी. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे भाजपच्या पालकमंत्र्यांना बालकमंत्री म्हणाले होते. मोदींच्या नावाने जी गुंडशाही सुरू आहे ती थांबली पाहिजे. प्रभू रामचंद्रचं नाव घ्यावं आणि बगलेत सुरी ठेवायची हे चालणार नाही, असेदेखील कडू ठामपणे म्हणाले.रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं. कार्यालयात घुसून राणा यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले. आता ज्यांनी पक्षाचे कार्यालय फोडले, त्यांचाच झेंडा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. मला वाटतं एवढी लाचारी अन्य कोणत्याही पक्षावर येत नसेल. आम्ही बोललो तर त्यांना राग येतो, अशी खोचक टीकाही कडू यांनी भाजपवर केली.