मुंबई ( वृत्तसंस्था ) राज्यातील शेतकरी बदलत्या हवामानाच्या तडाख्याने चांगलाच हैराण झाला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पिकविमा योजनेसाठी जाहिरात करत प्रोत्साहित केले आहे. यापार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरा वार केला आहे.


पटोले म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, राज्य सरकाने सोयाबिनच्या नुकसान भरपाईपोटी 25 टक्के शेतकऱ्यांना द्यावेत असे पत्र वीमा कंपन्यांना दिले पण ते पत्र या विमा कंपन्यानी केराच्या टोपलीत टाकले.


विमा कंपन्या सरकारला भीक घालत नाहीत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नाही तर पंतप्रधान मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.2014 साली नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आले पण मागील 10 वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र दहापट वाढल्या आहेत. असा ही टोला लगावला आहे.