मुंबई : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गायकवाड या उद्धव ठाकरे यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याने यासाठीच त्यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच, अशा शब्द दिला आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म दिले. वर्षाताईंना खासदार करुन दिल्लीला पाठवणार आहे. देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्या कुठूनही उभ्या राहिल्या, तरी विजयी होतीलच. त्यातही त्यांना मिळालेला मतदारसंघ हा माझा घरचा मतदारसंघ आहे. तर, उत्तर मुंबई लोकसभेबाबत तुम्हाला आणि आम्हाला उत्तर मिळेले. पण घोसाळकर आणि इतर सर्व जागेवर आहेत, त्यामुळे या मतदारसंघाचा उमेदवार लवकरच कळेल, अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली.

2004 ची पुनरावृत्ती होणार…
उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याबाबत बोलताना काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या की, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ माझ्यासाठी नवा नाही, मी इथे काही महिन्यांपासून राहात आहे. त्यामुळे इथली मला माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्हीही सहा लोकसभा जिंकणार आहोत आणि या मतदारसंघात 2004 ची पुनरावृत्ती होणार, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.

माझे मत वर्षा गायकवाड यांना…
गेल्या 10 महिन्यांपासून या मतदारसंघात राहत आहे. त्यामुळं हा मतदारसंघ नवा नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2004 ची पुनरावृत्ती होईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. यावर उद्धव ठाकरे यांनी वर्षाताई एक मिनिट माझं मत तुला मिळणारे, असं म्हटलं. मी तिचा मतदार आहे, असं ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मी पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल त्यावेळी तुतारी फुंकणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 70 हजार कोटींचा घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याबाबत तुम्ही आरोप करत होतात. ते लोक तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना क्लीन चीट कशा मिळाल्या, असं लोकं विचारतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना ईओडब्ल्यूनं क्लीन चीट दिली होती, त्याचा तपशील दोन दिवसांपूर्वी समोर आला होता, त्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. नाना पटोले म्हणतात तसं, काही लोक चावीचं खेळणं आहेत, जशी चावी दिली जाईल तसं खेळतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली.